Thursday, 13 June 2019
सोल्जर ट्रंक आणि कॉलेज संदूक
सोल्जर ट्रंक आणि कॉलेज संदूक
देवनुर एक छोटे रेल्वे स्टेशन, पुणे मिरज ते बेंगलुरू पर्यंत अन पुढे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर !
आज जे पार्सल इथे उतरणार होते त्या वर जवळ जवळ १८०० च्या किलोमीटर च्या प्रवासात खूप जणांचे डोळे लागले होते, जैसलमेर - जोधपूर पॅसेंजर तिथून जोधपूर - ते आरसीकेरे जंक्शन अन पुढे परत पॅसेंजर ! खरंतर सर्वसामान्य पार्सल च्या प्रवासात पार्सल खूप वेळा पुढे मागे होणे अथवा पुढे मोठ्या जंक्शन ला उतरणे मग बऱ्याच चकरा मारून मिळणे असे खूपदा होते अन त्याची कारणे हि खूप असतात. पण आजच्या पार्सल वर मिलिटरी कमांडंट ऑफिस तसेच त्यांच्या फॉलोअप मुळे संबंधित सर्व गाड्याचे रेल्वेच्या कमर्शियल कन्ट्रोल ऑफिस चे लक्ष होते.
आरसीकेरे जंकशन वरून सोल्जर ट्रंक पॅसेंजर ने निघाल्याचा मेसेज पण आला होता, पॅसेंजर आली प्लॅटफॉर्म वर थांबली अन बाबू लगबगीने गार्ड साहेबाच्या केबिन पाशी गेला, पार्सल कंपार्टमेंट उघडले गेले.
काळी लांबडी छान रंगवलेली अन त्या वर पांढऱ्या पेंट मध्ये रंगवले होते
राधिका गोपीचंद - वाइफ ऑफ सुभेदार गोपीचंद - स्टेशन देवनुर - आरसीकेरे जंक्शन - फ्रॉम जैसलमेर व्हाया जोधपूर पाठवणाऱ्याचा पत्ता होता, मिलिटरी कमांडंट ऑफिस, पोस्ट तनोट, जैसलमेर.
राधिका गोपीचंद म्हणजे अंजली वस्ताद ! सुभेदार गोपीचंद यांच्या गावातील पण त्यांच्या पेक्षा पाच वर्षांनी लहान ! प्रेम विवाह वगैरे काही प्रकार नाही ! मागणी घालून केलेला विवाह !
कॉलेज काळात अमर शी मैत्री ! दोघे गावाजवळच्या तळ्यावर संध्याकाळी सूर्यास्ता आधी चपटे दगड जोरात आडवे भिरकावून भाकऱ्या पाडायचे अन गाणी गुणगुणायचे ! गावातील पॅसेंजर ने तालुक्याच्या ठिकाणी रोज रेल्वेने कॉलेजात जाताना अन येताना ची मैत्री ! अमर गावातील शिक्षक लक्ष्मण रावांचा मुलगा ! थोडा धाडसी पण सालस !
सगळ्यांना वाटायचे जोडी जमतेय पण दोघांच्या गावी हि नव्हते कि गाव काय म्हणतेय ते ! त्यात सीताराम वस्तादाच्या मुलीशी प्रेम वगैरे म्हणजे एक चॅलेंज होते कि !
माधवस्वामी हे हाडाचे शेतकरी आणि पिढीजात शौर्याचा वारसा असलेले त्या मुळे धाडशी शेती जमीनदारी मध्ये नवे नवे प्रयोग करून पंचक्रोशीत नाव कमवलेले पण सुभेदार गोपीचंद हे त्यांचे दोन नंबर अपत्य आधी मुलगी छाया अन धाकटा मुलगा बालाजी !
सुभेदार गोपीचंदना सैन्याची आवड आजोबांच्या लहानपणाच्या छोट्या सहवासाने तसेच अनुवांशिक धाडसाने निर्माण झाली म्हणू शकतो !
माधवस्वामी यांनी सुभेदार गोपीचंद यांच्या साठी सीताराम वस्तादांच्या अंजलीला मागणी घातली व सून करून घेतली. अंजलीची झाली राधिका ! संसार मजेत घरदार वस्तादाच्या घरा पेक्षा मोठा मामला पण राधिका रमली सुभेदार आधी ज्युनियर कमिशन ऑफिसर होते मग प्रमोशन ने सुभेदार झाले. दरवर्षी तीस ते चाळीस दिवस सुट्टी मग एक मुलगा अन मुलगी अशी संसारवेल बहरली.
अमर कॉलेजमध्येच प्रोफेसर झाला त्याची पत्नी स्मिता पण प्रोफेसर तो हि मित्र मंडळींच्या ओळखीतून संदर्भाने विवाह खरंतर अमरच्या अव्यक्त अंजली प्रेमानंतर, थोडासा जीवनात झालेला फेरबदल पण नियती काही वेगळे सुचवणार होती नंतर ! स्मिता ला गर्भाशयाचा कर्करोग निश्चित झाला लग्नानंतर लगेच अर्थात धाडसी व सालस अमर ने ते झेपवले ! लग्नानंतर तीन वर्षात स्मिता चे निधन झाले ! अमर खूप रडला पुरुष असून ती गेल्यावर आणि नंतर कोणाशी विवाह न करता दाढी वाढवून राहू लागला. सगळ्यांना वाटत होते अमर संन्यस्त होणार पण त्याला स्वप्नात कै लक्ष्मणराव आले मग अमर परत कॉलेज मध्ये पूर्ण वेळ पुन्हा लक्ष देऊ लागला गढून गेला.
हिवाळा संपून उन्हाळा सुरु झाला पहाटे अन रात्री सरहद्दीच्या हालचाली सुरु झालाय कुठे घूसपेठ कुठे भूमिगत सुरुंग तर कुठे थोडंफार गोळीबार !
तनोट च्या मातेश्वरी देवी वर श्रद्धा असलेले सैनिक, देवीला भक्ती भावाने पुजून डोळ्यात तेल घालून गस्त द्यायचे.
इकडे सुभेदार गोपीचंद यांचे वय ३५ झाल्यापासून वडील माधवस्वामी हे अत्यंत भावुक झाले मग गावातील श्री शंकर मंदिरात असा एकही सोमवार गेला नाही कि सोमवारी महामृत्युन्जय जप आणि अभिषेक झाला नाही. मंदिरातील पुजाऱ्याला अन ब्रह्मवृदांना पण एवढेच ज्ञात होते कि माधवस्वामी त्यांच्या वाढत्या वया मुळे हे व्रत अनुष्ठान करत आहेत म्हणून पण कारण वेगळे होते. त्यांच्या आई अक्कमाचे एक विश्वासू गाववाले ज्योतिषी होते त्यांनी अक्कमाच्या सांगण्यावरून एक नातवाची फलज्योतिष पत्रिका तयार केली होती त्यात स्पष्ट भाकीत होते कि वय ३५ ते ३८ मध्ये जर जीवास काही बरे वाईट झाले तर फक्त कैलासनाथच वाचवू शकतो.
आज देवनुर च्या स्टेशन वर माधव स्वामींचे डोळे भरून आले ती सोल्जर ट्रंक ताब्यात घेताना कारण पुढे जवळ जवळ सात वर्षाची प्रतीक्षा होती. नुकत्याच झालेल्या सरहद्दीवरील धुळीच्या वादळावेळीच काही भूसुरुंग हि फुटले, गस्तीवरील सर्व सैनिक तसेच अधिकारी बंकर / चेक पोस्ट वर परत आले पण सुभेदार गोपीचंद परत आले नाहीत. त्वरेने सर्व चेकपोस्ट बाबिलायनवाल / लोंगेवाल / तनोट आदी मध्ये मिलिटरी संदेश गेले. मिलिटरी सर्व्हेलन्स आणि इन्फॉर्मशन डिपार्टमेंट ला कळवण्यात आले तीन दिवस इंटेस्टिव्ह चेक घेण्यात आला पण काहीही सूचना नाही.
पाचदिवसांनी त्यांचे काही सामान विखरून पडलेले मिळाले पण सुभेदार गोपीचंद अथवा त्याच्या देहाचा काहीही शोध लागला नाही, जुन्या आणि नव्या अधिकाऱ्यांच्या बैठका अनुभव अगदी लेटेस्ट सामुग्रीने शोध घेण्यात आला.
जवळच्या सैनिक अधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी तनोद मातेश्वरी देवीला साकडे घातले, त्यांचा अनुभव पाच दिवसात फळ मिळते म्हणजे साकड्याचे उत्तर अथवा समाधान सापडते.
जैसलमेर मिलिटरी कमांडंट नी आधीच दिल्ली आणि देवनुर ला माधवस्वामी तसेच राधिकेस सूचना दिली होती पण आज नियत कालावधी नंतर आज जैसलमेर मिलिटरी कमांडंट ने जवळच्या चीजवस्तू कपडे ह्याची सोल्जर ट्रंक हि राधिकेच्या नावाने नाईलाजास्तव खेदाने पाठवली.
राधिका पार कोलमडली होती, धीराची, वस्तादाची पोर हिम्मत बाज, शिक्षण, शेती जमीनदारी आलेल्या गेल्याची उठबस ह्यात आणि सर्व बाबतीत, माधव स्वामींच्या कुटुंबाचा सर्व कारभार जवळ जवळ एक हाती सांभाळणारी राधिका तिच्या खोलीतून बाहेर येत नव्हती,
काही आठवडे गेले, राधिका खोली बाहेर येत नव्हती, तिच्या माहेरचे पण कोणी नव्हते विशेष ! मैत्रिणी बोलावल्या गेल्या ! माधवस्वामी अकम्मा तिची जाऊ दीर हे मोठ्या धीराने, राधिका ह्या आघातातून बाहेर येईल ह्या कडे बारीक लक्ष देऊन होते.
मंडळी सावध अंतर ठेऊन होती. जावेने सर्व बघितले होते ते माधवस्वामी अक्कमा तिचा पती ह्यांना सांगितले.
दोन तीन दिवस सूर्यास्ताला तळ्यावर ती जात होती अन एक दिवस ती अस्पष्ट पुटपुटली कि "अमर ! असे व्हायला नको होते गोपी मला सोडून जाता कामा नये"
चक्रे फिरली, वस्तादच्या घरी तिची कॉलेज काळातील चीज वस्तू असलेली संदूक माधव स्वामींच्या घरी आणण्यात आली, तिने लिहलेली वही आदी राधिकेच्या जवळ ठेवण्यात आले.
स्वतः जातीने माधव स्वामी आणि दीर बालाजी हे तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज आणि घरी, प्रोफेसर अमर यास भेटले, राधिकेस बोलते करण्यासाठी साकडे घालून आले.
प्रोफेसर अमर ह्यास आधी फार अवघडून आले पण राधिकेच्या सासरे आणि दिरांच्या आग्रहास्तव तो राधिकेस भेटण्या साठी तयार झाला.
शनिवार रविवार तो माधव स्वामींच्या वाड्यावर होता त्यांनी आग्रह केल्याने सोमवारी पण कॉलेज ला निरोप पाठवून तो राहिला.
नेहमी प्रमाणे गेले दोन तीन वर्षे चाललेला गावातील श्री शंकर मंदिरातील, महामृत्युजंय जप आणि आभिषेक संपन्न झाला. अनुष्ठान प्रसाद आणि तीर्थ घेऊन माधव स्वामी वाड्यावर आले. ते, मुलगा बालाजी , जाऊ लक्ष्मी आणि अमर, राधिकेच्या खोलीत गेले.
जाऊ लक्ष्मीने पुढे होऊन प्रसाद आणि तीर्थ राधिकेस दिले. ती पूर्ण उन्मळून पडली थेट सोल्जर ट्रंक आणि कॉलेज संदूक ठेवली होती तिथे !
बेभान राधिका चिल्ला पिल्लाना आवाज देऊ लागली. माधवस्वामीनी बालाजीस सांगितले त्यांना खोलीत घेऊन यायला सांगितले ! गोपी गोपी आक्रोश करू लागली
काही वेळाने, अमर कडे बघून म्हणाली आपण तळ्यावर चपट्या दगडाने एकास वेळेस पाण्यावर भाकऱ्या पडायचो तेव्हा दोन्ही एकदम पुढे जायच्या तेव्हा तू म्हणायचास, मैत्रीत आपण कधी अंतर देणार नाही म्हणून ! जगात कुठेहि असलो तरी साथ देऊ म्हणून !
माधव स्वामी अचंबित झाले आणि त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली कि सात वर्षांनी गोपीचंद परत नाही आला तर सोल्जर ट्रंक आपल्याच कडे ठेऊन
राधिका आणि चिल्ली पिल्ली ह्यांच्या राजीखुशीने मुलांना पुढील शिक्षणासाठी प्रोफेसर अमरकडे पाठवायची शहरात !
© रविंद्र गांगल
(प्रस्तुत लेखातील नावे अन स्थळे थोडी आधारित अन काल्पनिक, अस्तित्वात असलेल्या व्यक्तीशी साधर्म्य असेल तर योगायोग समजावा.)
सौजन्य : इंटरनेट संदर्भ, गुगल मॅप्स, गूगल सर्च इंजिन आणि रेल्वेसंबंधी साईट्स
(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
वाह क्या बात है! उत्कंठा खूप वाढत गेली वाचताना.
ReplyDelete