Wednesday, 29 April 2026

 बदल हवाय असे वाटते आहे  - महाराष्ट्र देशा

शेवटच्या चाकावरून 


परत खूप साऱ्या दिवसांनी हे लिहायला घेताना, सहज मनात आले कि आपण सगळेच खूप बदल अनुभवतोय, एक्सप्रेस वरून फ्री वे, अटल सेतू , समृद्धी, टनेल्स प्रवासाची सुरवात, मेट्रो, ए सी लोकल्स, वंदे भारत विस्तार पुढे आता महाराष्ट्र दिनी सुरु होणारी मिसिंग लिंक 


मागे एका लेखात लिहिले होते कि खंडाळ्याचा घाटातून रात्री अपरात्री मेल ट्रेन वरून काम करताना खूप साऱ्या वाहनाच्या रांगा दिसतात कधी त्यांचे दिवे धावत असतात तर एका ठिकाणी खोळंबलेले असे भोर घाटा सारखे थळ घाटात पण दिसायचे पण आधी एक्सप्रेस वे नंतर समृद्धीने ती वाहतूक एकदम जलद गतीने होताना दिसते 


आमच्या काही सहकाऱ्यांनी ह्या वाहतूक वेगा बरोबर सामाजिक जाणिवेचा वेग हि चांगला धरला आहे, पूर्वी एक सातत्य मंडळ होते आमच्या कर्मचाऱ्याचे ! 

 ते आमच्या रेल्वे कुटुंबातील मुलांना मुलींना शैक्षणिक बक्षिसे देत होते पुढे आता आमच्या एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी तर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गुणी  मुली मुलांचा सत्कार आणि रोख बक्षिसे देतात. 


पुढे इनर व्हॉइस, रेल मित्र परीस स्पर्श तसेच महाराष्ट्र मंडळ, शिव जयंती मंडळ व पे बॅक टू सोसायटी अश्या संस्था आणि उपक्रम रेल्वे कर्मचारी इतर समाज वर्गासाठी चालवत असतात. 


बदल हवाय महाराष्ट्र देशी ..................... असे शीर्षक आणि लेख सुचला त्याचे कारण असे झाले कि 


नदीत कपडे धुताना महिलेचा मृत्यू असे वाचनात आले ...................


सहज ह्यातील काही शब्द सर्च इंजिन वर टाकले आणि वाचले तर खुप साऱ्या घटना आणि बातम्या आहेत . खूप वाईट वाटले 


मध्यंतरी माझा एक जुना लोकल मोटरमन नातेवाईक सहकाऱ्यांची भेट झाली, त्यांनी दोन एक वर्षा पूवी स्वेच्छा निवृत्ती घेतली, विचारले काय करतोस हल्ली तर म्हणाला समाजात काम करणारे काही क्लब / संस्था आहेत त्यात काम करतो, मग मी त्याला म्हंटले माझ्या मनात एक विषय खूप वादळ करतो आहे तो मी लवकरच लिहिणार असे नक्की वाच.


दख्खन च्या पठारा वरून म्हणजे पुण्या कडून अथवा झालेच तर राजधानी अथवा वंदे भारत जळगाव अथवा शिर्डी वरून झालेच तर रत्नागिरी वरून मुंबई कडे येताना अनेक ठिकाणी नद्या दिसतात त्या नद्यांच्या काठावर दिवसा म्हणजे खास करून दिवस दुपार कडे वळताना अनेक स्त्रिया नदी तीरावर कपडे धुणी दिसताना दिसतात अथवा भांडी घासताना दिसतात. 


ओह दुःखाने सांगावेसे वाटते कि खूप घटना अश्या आहेत ह्या बाया बापड्या काही वेळा वाहून जातात तर काही वेळा ह्यात त्यांना प्राण गमवावे लागत आहेत, त्या वेळेस त्यांना वाचणारे जवळ जवळ कुणीच नसते,  आता ह्याच भागात जसे परदेशात असतात तसे वेगवान रस्ते होत आहेत, मेट्रो बुलेट ट्रेन नवीन विमानतळ होत आहेत, परदेशात जे लेटेस्ट प्रॉडक्ट आणि सर्व्हिस आहे ती इथे उपलब्ध होत आहेत मग मनात येते परदेशात रेंटल हौसिंग कॉम्प्लेक्स मध्ये कम्युनिटी लाँड्री मशिन्स असतात, त्यावर भाडेकरू सदनिका धारक आपल्या कपड्यांचा लॉट टाकतो धुणे वाळवणे आणि कोरडे होणे हे सगळे ते लाँड्री मशीन करते, बरं, ते मशीन सुंदर लॉक होते आणि सिम कार्ड अथवा मोबाईल अँप द्वारे पेमेंट केले कि सुरु होते. 


आता बाया बापड्या धुणी धुताना वाहून जातात, नदीचे पाणी प्रदूषित होते त्या ऐवजी निदान महा मुंबई आणि महा पुण्याच्या  जवळ काही सामाजिक संस्था. सोशल स्टेटस वेल्फेअर क्लब तसेच काही श्रीमंत देवस्थाने अथवा उत्सव मंडळे ह्यांनी अश्या काही ठिकाणी नदी काठी  कम्युनिटी लाँड्री मशीन बसवण्याची व्यवस्था केली तर बाया बापड्यांचा जीव वाचेल, नदी प्रदूषित होण्याची वाचेल, नारू सारख्या रोगराई ( हल्ली आपल्या कडे नाही असे वाचनात आले, चांगलेच आहे)  अथवा तत्सम अनेक व्याधी पासून त्या दूर राहतील  तसेच ते मशीन होताना त्या स्त्रियांना साक्षरता वर्ग प्रौढ शिक्षण कुटुंब कल्याण कार्यक्रम तसेच मुलांचा अभ्यास अथवा स्वतः साठी वाचन करू शकतील.


कम्युनिटी वॉशिंग मशिन्स जर लोक प्रतिनिधी निधी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसेस अथवा ग्रामस्थ मंडळे ह्यांचा मार्फत बसवता येतील का हे पण पडताळून बघायला हवे अथवा आपल्या प्रगतिशील राज्यात अनेक संस्था अथवा वेल्फेअर / चॅरिटी क्लब अथवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसबलीटी अंतर्गत कंपन्या कडून मदत घेता येऊ शकेल असे वाटते.नाम मात्र अथवा देखभाल शुल्क हे संस्थांनी आणि उपयोगकर्त्या मंडळीने वाटून भरावे 


येणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


@रविंद्र गांगल 

शेवटच्या चाकावरून 

३० एप्रिल २०२६ 


(पोस्ट चा बहुतेक भाग मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत,  एखाद्या विषयाचे समयोचित  कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना,  कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल  ह्या अपेक्षेने हा खटाटोप !) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)


Saturday, 31 January 2026

ट्रिपल एम ते राजधानी

गेल्या पंधरवड्यात सकाळी कर्जत ते मुंबई लोकल ने प्रवास करत होतो. ती फास्ट लोकल होती परळ येथे प्लॅटफॉर्म अपुरा पडतो १२ डब्याच्या लोकल ला तेव्हा दोन वेळा थांबली ....................
तेव्हा
मनाने धाव घेतली १९९० पूर्वी, म्हणजे १९८७-८८ मध्ये मी संध्याकाळी प्रवासी म्हणून ट्रिपल एम लोकल ने मुंबई ते मुलुंड प्रवास करायचो, विशेषतः संध्याकाळी होती सव्वा सहा ते साडे सहा सुमारास, बहुतेक ०६:२८ ची लोकल ट्रिपल एम असायची,मस्जिद, माटुंगा आणि मुलुंड असे हॉल्ट होते...

मस्जिद बंदरला पाचवा सहावा प्लॅटफॉर्म होता पण तो लहान होता म्हणून ९ डब्याची लोकल दोन वेळा थांबायची.

वडील १९५०-५३ मध्ये ठाण्याहून मुंबईला कॉलेजला जायचे तेव्हाची आठवण सांगायचे ते आणि काही मित्र कधी कधी दोन ठिकाणी बटाटा वडा खायला जायचे एकतर दादर येथे मामा काणे नाहीतर कर्जत येथे दिवाडकर वडा ! वडापाव खूप नंतर १९७०-८० दशकात आला.

रेल्वेच्या स्टेशन आणि प्लॅटफॉर्म आधुनिकीकरणात रुंदीकरणात खूप जुन्या आठवणीची ठिकाणे बदलली. कुर्ला कारशेड ला न्यू कुर्ला कारशेड का म्हणतात ? ह्या बद्दल सांगितले जाते आधीची छोटी कारशेड कुर्ला यार्ड च्या आधी होती आणि मग ती पश्चिम बाजूला निर्माण झाली.

कुर्ल्याचे जुने स्टेशन म्हणे आत्ता खूप सारे कुर्ला पूर्वेकडील टेकडीच्या समोर भागात होते आणि तेथील मुन्सिपल शाळेचे नाव ओल्ड स्टेशन कुर्ला शाळा होते.

ठाण्याला आताच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या मुलुंड मुंबई बाजूला ब्रिज बाजूला एक लाकडी ठोकळ्यांचे आणि लाकडी घड्याळ्यांचे इंडिकेटर होते. ब्रिज खाली टी. सी. ऑफिस मधून एक कर्मचारी हॅन्डल वाला रेल्वे इंटरकॉम फिरवून पुढच्या गाड्या विचारायचा आणि मग येऊन लाकडी ठोकळे आणि घडाळ्याचे काटे फिरवायचा

ठाण्याच्या पुढे डोंबिवली स्टेशनचे चार प्लॅटफॉर्म आणि त्याच्या बाजूचे लेव्हल क्रॉसिंग गेट आठवते.

आत्ताचे ठाणे एक नंबर प्लॅटफॉर्म आणि कल्याण एक नंबर प्लॅटफॉर्म हे मालधक्के होते आणि प्रामुख्याने सिमेंट आणि अन्नधान्य गोणीतून उतरायचे.

मुंबईला १९९० पूर्वी फक्त १५ प्लॅटफॉर्म होते त्यात ९-१५ प्लॅटफॉर्म वर खूप मोठी पोलादाची हायड्रॉलिक बफर्स होती, त्यात प्रचंड पाणी भरलेले होते, क्रमांक १६-१८ आणि पुढील भाग १९९० पूर्वी कर्नाक बंदर म्हणून ओळखला जायचा आणि तो पश्चिम रेल्वेच्या ताब्यात होता.

पुश पूल तंत्रज्ञान पद्धत मध्य रेल्वे ला नवी नाही, साधारण तश्याच पद्धतीचे तंत्र वापरून तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री कै सुरेश कलमाडी ह्यांच्या प्रयत्नाने मुंबई पुणे मुंबई वातानुकूलित शताब्दी एक्सप्रेस सुरु झाली होती तिला मुंबई पासूनच पुढे मागे इंजिन होती पण व्यावसायिक दृष्ट्या ती यशस्वी झाली नाही झाली नाही पुढे त्याच मार्गावर म्हणजे रेल्वेपाथवर इंटर सिटी नावाची गाडी धावू लागली जी यशस्वी झाली.

मन आठवणीत राजधानी एक्सप्रेस वेगानेच धावत होते आत्ताची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन दिल्ली राजधानी मध्य रेल्वे मार्गे १९ जानेवारी २०१९ रोजी सुरु झाली आणि थोड्याच कालावधीत रोज धावू लागली........ हिवाळयात धुक्याच्या काळात थोडी विलंबाने चालते पण अजूनतरी वंदे भारत पुढे राजधानीचा रुबाब आहे.

© रविंद्र गांगल
( आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर हे लेखन आधारित आहे आणि “शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग)
(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Friday, 4 October 2019

"रवि"

"रवि"


*दूर नहीं हुं, दूर नहीं हुं 

फिर आऊँगा कोहरे मे रहुंगा

थंड लगी तो याद करना

बादलो को दूर करूंगा 

फिर आऊंगा...लाऊंगा 

कभी तेज कभी प्यार भरा जीवन


फिर आऊँगा... लाऊंगा 

भाल पे गाल पे

फिर सुबह कि लाली लाउंगा 

दूर नही हुं...दूर नहीं हुं

फिर आउंगा*

दूर नहीं हुं, दूर नहीं हुं


(जाडे का या  थंड का मौसम आया ही समझो  !ओर फिर सुरज याने "रवि" क्या व्यक्त होता है पढिये !बस पंक्तिया है, गद्य है या पद्य ? उसे आप समझ लिजिए !)

© रविंद्र गांगल( Displayed at FB timeline 4th October 2019)


Thursday, 1 August 2019

दखल

दखल

साधारणतः ५५ वर्षे वयाच्या वरील तीन लाख कर्मचाऱ्यांना निवृत्ती दिली जाणार अश्या प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमात झळकू लागल्या अन एक चर्चा सुरु झाली.
मुळात नोकरीची तीस वर्षे आणि / अथवा पंच्चावन वर्षे पूर्ण झाली कि सर्व्हिस रिव्हयु घ्यावा हि चौथ्या वेतन आयोगानंतरच्या काळापासून आलेली तरतूद आहे असे म्हंटले जाते त्याची काही ठिकाणी अंमलबजावणी पण झाली जरुरी पुरती अर्थात गवगवा आत्ता सुरु झाला कारण वाढत्या प्रौद्योगिकीच्या वापरा मुळे काही विभागांच्या नैमित्तिक कामात पूर्ण बदल होत गेला अन ह्या पुढेही जात राहील.


उदा. रिझर्वेशन सेंटर पहिले एक दोन मजली तीस तीस काउंटरस चे ठराविक ठिकाणी होते मग सर्व दूर झाले अन आत्ता खूप सारी तिकिटे मोबाईल अँप वर तसेच वेबसाईट च्या माध्यमातून विक्रीस येऊ लागली मग रिझर्वेशन सेंटर्स मधील स्टाफ अन त्या साठीच्या इमारती ह्याचा उपयोगाबाबत मंथन सुरु झाले हेच फक्त रेल्वेतच घडत आहे असे नाही तर विमा, बँका रोड ट्रान्सपोर्ट शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी कंपन्या इस्पितळे विद्यापीठे अश्या विविध संस्था यांना प्रौद्योगिकी च्या वापर बदला मुळे होणाऱ्या परिमाणाना सामोरे जावे लागत आहे आणि पुढील काळातहि जावे लागेल.

१९९० च्या दशका नंतर नवीन आर्थिक सुधारणा, गॅट डंकेल प्रस्ताव अन प्रौद्योगिकी हे सगळे हातात हात घालून आले, व्हाईट कॉलर ब्ल्यू कॉलर एवढेच नव्हे तर पिंक कॉलर म्हणजे अधिकारी वर्ग ह्याच्या सगळ्यावर एक कॉस्ट कटिंग चे भूत शिरले त्यातून कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, नॉट ऑन कंपनी पे रोल, हायर अँड फायर हे सर्व जोर धरू लागले.

ब्रिटन मधील रेल्वेचे खाजगीकरण झाले अन पुनः सरकारीकरण झाले अर्थात ह्याचा शोध अन बोध घेतला गेला नाही तो घ्यायला हवा.

कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स च्या अथवा ह्या १९९० च्या नंतरच्या ह्या सर्व अतिवापराचे परिणाम आता इकॉनॉमी वर स्पष्ट दिसू लागले आहेत असे मानावे लागेल कारण टेलिकॉम, विमान कंपन्या बँका ह्या धडाधड बंद पडू लागल्या कारण सॅलरी कॉस्ट कटिंग मुळे निदान आस्थापनांचे तीस ते पन्नास हजार रुपये वाचू लागले पण तेवढ्याच रुपयांनी प्रत्येक कर्मचारी मागे म्हणजे देशभरातील विविध संस्था मधील समजा काही लक्ष कर्मचारी ह्यांच्या मागे काही कोटी अथवा अब्ज रुपये वाचले असले तर त्याचा दुसरा अर्थ तेवढे पैसे हे मार्केट इकॉनॉमी मधून गायब झाले. म्हणजेच मंदीने पकड घ्यायला सुरवात झाली.
नवीन आर्थिक सुधारणा, गॅट डंकेल प्रस्ताव अन प्रौद्योगिकी चा १९९०-२००० च्या दशकात खूप बोल बाला होता पण चीन ने औद्योगिक आणि वैश्विकरणाची दारे उघडल्या नंतर २००० -२०१० च्या दशकात अमेरिकन कंपन्या अन तिथली मार्केट इकॉनॉमी गोते खाऊ लागली मग कुठे त्यांना जाग येऊ लागलेय कि ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन हे घातक आहे का ?

अमेरिकेच्या खाजगी बँका आणि मालमत्त्ता कर्ज कंपन्यांना वाचवण्यासाठी तेथील फेडरल सरकार अन केंद्रीय अर्थ संस्थेला साह्य करावेच लागले अन हे जगाने पहिले कि सरकार कर्जबाजारी अन सरकारी कर्मचाऱ्यांना ले ऑफ अथवा टाळेबंदी पण कंपन्या वाचवण्यासाठी तेथील सरकारची धडपड !

आपल्या कडे जागतिक बदलाची स्थिती अथवा तेथील दोन्ही दृष्टीकोनात होणार बदल सामावून घेण्याची जरी वृत्ती आणि दृष्टी असली तरी लोकसंख्येचा अन बेकारांची संख्या हे सॅलरी कॉस्ट कटिंग च्या भुताला अधिक गहिरे करतात.

अर्थ सुधारणा जागतिक करार अथवा त्याचा अंमलबजावणी मुळे कर्मचारी कामगार हयांच्ये संख्येची कपात अन नवीन कॉन्ट्रॅक्ट कामगारांना पूर्वीच्या तुलनेत दिला जाणारा तुटपुंजा पगार ह्या मुळे सर्वच क्षेत्रे ढवळून निघत आहेत.

मोठ्या शहरातून मोठ्या प्रमाणावर स्त्री पुरुष दोघांना जीवन खर्चाचे तारू साधण्यासाठी नोकरी करावी लागत आहे त्यात जर ती तुटपुंजी पगाराची असेल तर मग लग्ने उशिरा अथवा लिविंग रिलेशनशिप, गे अथवा लेझबीन साथीदार तसेच सेक्स वर्कर आधी सामाजिक समस्या अधिक जोमाने जोर धरू लागल्या आहेत.

एवढेच नाही समाजाच्या सर्व थरातील कामुकता, लैंगिक गुन्हे, मोबाईल गेम्स आत्महत्या आदी पण वाढत्या प्रौद्योगिकीच्या गैर वापरा मुळे वाढत आहे असे म्हटले जाते.
वर्किंग क्लास चे पगार अथवा खात्रीच्या नोकऱ्या कमी झाल्याच्या फटका आता गृहनिर्माण क्षेत्रात बसत आहे हजारो फ्लॅट तुलनेने स्वस्त भागात रिकामे आहे पण झोपडपट्टी कमी झाल्याचे ऐकायला येत नाही

सेवा, पर्यटन, हॉटेलस, ऑटोमोबाइल्स ह्या सर्वा मधील डिमांड हा पूर्ण वेगाने संकुचित होत आहे अन पुढे आणखीन होईल अशी चिन्हे आहेत.
नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, गोल्ड कंपन्या ह्यातील जीवघेणी स्पर्धा बदल अन कर्जबाजारी, पायाभूत कर्ज साह्याय्य आणि त्यातील कमी अथवा ऋण परतावा ह्या सर्वाचा परिपाक म्हणून एका शीर्षस्थ संस्थेतील कर्जाचा आकडा तर कधीच अंदाजे ९०००० हजार कोटींनी पार केला आहे असे म्हणतात.

ह्या सर्वाची दखल केवळ कामगार, नागरिक, कर्मचारी, अधिकारी. समाजकारणी व सुशिक्षित तसेच लोक प्रतिनिधी ह्यांना वेळेत घ्यावी लागेल असे निश्चित वाटत आहे.

© रविंद्र गांगल

( शेवटच्या चाकावरुन -सेवानिवृत्ती समयी अथवा नंतर प्रसिध्द होऊ शकणाऱ्या अथवा ह्या नावच्या ब्लॉग चा एक भाग )(जीवन अनुभवातील आधारीत लेख अथवा पोस्ट,चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

Saturday, 13 July 2019

वारी समाधानाची - श्री भानुदास निर्मळ



वारी समाधानाची - श्री भानुदास निर्मळ


मूळचा माळशिरस गावचा पण लहानपण / तरुणपण  वडिलांसोबत पुण्याच्या गरिबावस्तीत राहिलेला,  मुंबईत  काही वर्षापूर्वी सेवा निवृत्त झाला तेव्हा त्याच्या वतीने जेष्ठ सहकारी यांनी त्याचे दोन शब्द व्यक्त केले ते खालील प्रमाणे :

"आयुष्यात आपण आपल्याला सुख समाधान मिळावे यासाठी खूप धडपड करतो पण इतरांच्या व्यापक हिताचे अन् सुखाचे  लक्षात घेऊनच  स्वतःच्या सुख समाधानाला आवर घालण्यासाठी प्रसंगी कटू वाटणारा निर्णय घ्या"

भानुदास निर्मळ ! एक चतुर्थ श्रेणीतील कामगार सहकारी पण त्याच्या सेवा निवृत्तीला निदान दोनशेएक  माणूस जमला, एका ऑफिस बिल्डिंग च्या गच्चीवर छोटेखानी कार्यक्रम झाला. कागदी प्लेट मध्ये बटाटा चिवडा / साबुदाणा चिवडा अन बटाटा वेफर्स तसेच गोड म्हणून साजूक तुपातील दोन दोन जिलेबी व नंतर फक्कड मसाला दूध !

भानुदास एकदम बुवा माणूस !
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ  नामदेव तुकाराम
जय जय रामकृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आम्ही विष्णू दास

हा मंत्र म्हणत तो खात्यात काम करत होता अन सोबत जे चित्र दाखवले आहे त्या सारखा टिळा तो नेहमी आपल्या कपाळी लावत असे.
भानुदास नेहमी वारीला न चुकता जाई अगदी सर्व्हिस मध्ये जर रजेच्या बद्दल गोंधळ गडबड झाली तर मोठ्यात मोठ्या साहेबा कडे जाऊन वारीच्या काळात पूर्ण आळंदीतून पालखी निघून पंढरपुरास जाऊन परत आळंदीत येई पर्यंत भानुदासांची रजा असायची.
पूर्ण वर्ष एखादी पण दांडी नाही अगदी जर सागेसोयऱ्या मध्ये कार्यक्रम असेल तर त्या पुरती रजा फक्त ते सुद्धा दरवर्षी नाही !

बाहेर खात्याच्या गणवेश अन आत लाल कॉटन बंडी ! आधी भेट झाली तर मला वाटले कि डोक्याने गरम असेल कारण लाल रंग पसंत आहे म्हणून पण म्हणायचे टक्कुरं फिरले तर गरम नाहीतर पार थंड !

 फक्त माऊलीचा जयघोष करायचा मग सगळी कामे होतात विनासायास !

मी खात्यात नवीन लागलो तेव्हा  तर इतर सगळ्यांना चहा नाश्ता देताना माझ्या टेबलावर जवळ आले अन म्हणाले अगदी काश्याच्या लाल्या टाईप दिसता ( तरुणपणी ढप नव्हतो ) मग कडक चहा तुम्हाला माझ्या तर्फे ! मी म्हंटले असे नाही तुम्ही कशाला उगीच खर्चात पडता तर म्हणाले वयाने मोठा असलो तरी तुम्ही नवीन छोटे साहेब आहात.

रोजच्या रोज चंदनगोळीचा आकडा त्यात शेंदूर पद्धतीचे लेपन अन वर काळ्या बुक्क्याचा  टिळा !

मुखी माऊलीचा जयघोष ! ते  ते ऑफिसात आले कि ........"अवघे गर्जे पंढरपूर......" ह्या पदाची आठवण व्हायची.

एक वर्षे मुंबईत हि गडगडाट सह उन्हाळाच्या सरते शेवटी पण पावसाळ्या आधी पाऊस धरला !

मी कार्यालयाच्या जवळ राहायचो आणि लग्न झाले नव्हते मग सकाळी कार्यालयात  पोहोचलो तर चावीवाल्याने ऑफिस उघडून दिले व मी थोडी टेबल खुर्ची धड करणार तेवढ्यात मागून आव्वाज आला नेहमीचा !

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ  नामदेव तुकाराम
जय जय रामकृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आम्ही विष्णू दास

त्या दिवशी कार्यालयांत उपस्थिती तुरळक होती, डिव्हिजन ऑफिस मधून फोन आला किती जण आले आम्ही नावे घेतली अन मग समोरून हाच जयघोष आला तर ते साहेब म्हणाले कि आलेच असतील श्री निर्मळ ! मी अचंब्याने हो म्हंटले तर समोरून फोन वरून साहेब म्हणाले तरुणपणीचा "भान्या" पार बदलून आता भानुदास बुवा झाला !
 फोन ठेवला गेला !

मी माउलीला म्हणजे भानुदास बुवांना हाक मारतोय तर ते तर चहा आणायला गेले होते ! यथावकाश चहा आला मग मी बुवांना फोन वरील संवाद सांगितला  तर ते म्हणाले 

"पुण्याचे दोन जण साहेब म्हणून डिव्हीजनल ऑफिस ला आहेत, ते मला अन माझ्या बा ला पहिल्या पासून ओळखतात"

त्या दिवशी मोकळा वेळ होता मग बोलणे झाले

भानुदास चे वडील पुणे मालधक्क्यावर हमाली करायचे अन त्यांचीच आठवण म्हणून भानुदास युनिफॉर्मच्या आत लाल बंडी वापरायचे. वडिलांनी खस्ता खाल्या पण दोन मुले आणि दोन मुली ह्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, मुली शिकल्या दहावी पर्यंत पण मुले शामराव अन भानुदास शिकेना कारण त्यांना एक मित्र होता गोप्या मग तिघे मिळून हुल्लड बाजी करायचे त्यात शामराव रस्ते अपघातात स्वर्गवासी झाला वडिलांनी हाय खाल्ली भानुदास ला पुण्याचे माने साहेब व जोशी साहेब ह्यांच्या समोर उभा केला मग त्या दोघांनी भानुदास ला रोजंदारी कार्डावर भरती केला यथावकाश भान्या झाले  भानुदास झाले


भानुदास, शामराव  अन गोप्या तिघे  दोस्त पण तरुणपणीच्या मौज मजा दंगा मस्तीत शाम्याचा बळी गेला  अन भानुदास रोजंदारीच्या कार्डावर खात्यात भरती झाले अन गोप्या रिक्षा लाईन ला गेला.

नोकरीत सुरवातीला भानुदासाचे मन लागेना पण बा ची इच्छा म्हणून करणाऱ्या नोकरीत रोजंदारी तर रोजंदारी पण दांडी ते मारत नव्हते, परमार्थाला अथवा वारकरी पण झाले नव्हते.  खात्यात वजन टाकून दोन्ही साहेब लोकांनी भानुदासाला पर्मनंट केले, बा ने लग्न लावून दिले, कांचन लक्ष्मी म्हणून आली तेव्हा भानुदासांची मुंबईत बदली झाली.  टिटवाळ्याच्या पुढे खडवलीत एक खोलीची जागा घेऊन त्यांनी आपला संसार सुरु केला, कांचन दहावी झालेली अन भानुदास आठवी नंतर पुस्तक गुल ! पण कांचन वर जीव जडला त्यांचा अन राजा राणीच्या संसारात एक छोटी परी पण आली.

पुण्यात गोप्या रिक्षा लाईन मध्ये असताना आपली मस्ती करत होता, बाई, बाटली अन गुटखा ह्याने वेढलेला अन कधी मधी वर्षा काठी  भानुदासला गाठून उधारी उसनवारी  !
गोप्याच्या व्यसनांनी गोप्याला शिवडीचे टाटा कॅन्सर हॉस्पिटल  दाखवले, मित्रा च्या साठी भानुदास पुण्यास जाऊन गोप्याला घेऊन आले पण औषधोपचाराच्या बरोबर गोप्याने बाटली काही सोडली नाही. शेवटी गोप्याला मित्राच्या हातून अग्नी द्यावा लागला !

पण गोप्याने जाताना मात्र  भानुदासा कडून वचन घेतले कि माऊलीच्या दर्शनाला जाशील अन माझा पण नमस्कार सांगशील !

भान्या, भानुदास, भानुदास निर्मळ ते माउली माउली विठ्ठल विठ्ठल म्हणत येणारे अन आम्ही विष्णुदास म्हणवणारे,  श्री भानुदास निर्मळ कसे झाले ते समजलेच नाही !
रोज सकाळी माऊलीची पूजा अन ज्ञानोबा तुकोबांच्या  तसबिरीला गोपी चंदन टिळा लावून मग स्वतः गोपीचंदनाचा आकडा मध्ये केशरी गंध अन वर बुक्क्याचा ठिपका ! मग दिनचर्या चालू !

त्या दिवसाच्या पाऊस गोंधळ गडबडी मुळे, मला वारी बद्दल सखोल माहिती मिळाली,
वारी, दिंडी, लेझीम, गोफ, चोप, खेळ , उभे रिंगण, गोल रिंगण, अश्वाची दौड, ध्वज अन बरेच काही !

भानुदास बेभान होते अन बाहेर पाऊस हि !

पावसाच्या जोर वाढला तसे भानुदास अजून बेभान होऊन जीव ओतून सांगू लागले अनेक गमती जमती वारीच्या, पुणे, सासवड, वाखरीं, उरळी कांचन, अकलूज, चांदोबाचा लिंब, सदाशिव नगर ते थेट प्रदक्षिणा, भीमा काठ आदी, भानुदास वर्ष दोन काठी  कधी तुकोबांच्या तर कधी ज्ञानोबांच्या पालखी - वारीत जात जोडीदारा सोबत अन एक वर्ष तर कांचन बाई पण तुळशीवृदांवन डोई घेऊन सामील झाल्या जेव्हा मुलें मोठी झाली अन घरी आई आली होती तेव्हा !

भानूदास सांगत होते कि वारीतील आहार, जेवणखाण, उपास पदार्थ, साग भाजी, हुरडा तर कुठे जिलेबी, लाडू!

 सर्व माउली पुरवते आपल्या भक्ता करवी, पैसा घेऊन जावा वारीला तर परत येतो तसाच्या तसा ! वर येते समाधान ! माउली माउली !

गोप्याने जाताना माझ्या आयुष्याचे सोने केले म्हणत त्या दिवशी भानुदास रडले ! 

अश्रू थांबेना !

मी ऑफिसच्या चावीवाल्याला आवाज दिला अन त्याला आम्हा तिघांना चहा आणायला सांगितले !

चहा घेऊन आम्ही निघालो ! त्या दिवसाला बरीच वर्षे लोटली !

आज  श्री भानुदास निर्मळ सेवा निवृत्तीची पार्टी देत होते अन होते समोर त्यांचे मनोगत श्री जोशी साहेबांच्या शब्दात !

"आयुष्यात आपण आपल्याला सुख समाधान मिळावे यासाठी खूप धडपड करतो पण इतरांच्या व्यापक हिताचे अन् सुखाचे  लक्षात घेऊनच  स्वतःच्या सुख समाधानाला आवर घालण्यासाठी प्रसंगी कटू वाटणारा निर्णय घ्या"

रहावले नाही बोललो भानुदासांशी !  म्हणाले साहेब वारीला चला !

शहरातील लोक सकाळी चालतात पण वारीच्या मार्गावर ज्ञानोबा तुकोबा ह्यांचा २५० किमी च्या वारीत चला,

पैठण - सज्जन गड वरून येणाऱ्या पालखीत चला !  अथवा ताकद दाखवू शकत  असाल तर मुक्ताबाई अन गजानन महाराजच्या ४००-४५० किमी च्या पालखीत चला !

रांगोळी पताका चालतील पण फ्लेक्स बाजे नकोत
एकतारी लेझीम बरा!

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी ! तुळशी वृंदावन घेऊन माय भगिनी येतातच
गावो गावी  वडा पिंपळाचे पार संपत चालले ते लावायला रोपे  घेऊन चला
पण पालखीत चला !

आपले स्वतःचे  सुख समाधान सोडा अन वारीत चला बस माउली  उभी  आहे युगे अठ्ठावीस भक्तांच्या सेवेत
बस हीच समाधानाची वारी ! 

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ  नामदेव तुकाराम
जय जय रामकृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आम्ही विष्णू दास

© रविंद्र गांगल

( शेवटच्या चाकावरुन -
सेवानिवृत्ती समयी अथवा नंतर प्रसिध्द होऊ शकणाऱ्या अथवा ह्या नावच्या ब्लॉग चा एक भाग )(जीवन अनुभवातील प्रसंगात योग्य वाटेल असा बदल करून आधारीत लेख अथवा पोस्ट,चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)




Monday, 17 June 2019

व्यक्त की अव्यक्त !?

व्यक्त की अव्यक्त !?

दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे,
 पण दोघांची एकमेकाशी भेट नाही !!

पर्णा वरील दव बिंदू सारखे दोघे एकमेकांबरोबर असतात पण........

दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगतात अन् दोघे एकमेकांबरोबर खूप साऱ्या वेळेस एकत्र ही दिसतात पण....

खूप सारे जण प्रेम म्हंटले की त्यांची पदोपदी आठवण काढतात पण..

ते निकट असले अन् एकमेकाच्या प्रेमात असले तरी कधीही ........

मग त्याला काय म्हणावे व्यक्त की अव्यक्त !?

© रविंद्र गांगल

( शेवटच्या चाकावरुन -
सेवानिवृत्ती समयी अथवा नंतर प्रसिध्द होऊ शकणाऱ्या अथवा ह्या नावच्या ब्लॉग चा एक भाग )
चित्र सौजन्य : इंटरनेट
आज पहाटे म्हणजे १८ जुन २०१८ च्या पहाटे साधारण सव्वा तीन ला नासिक च्या क्षितिजावर  झुकणारे चंद्र अन् शुक्राची चांदणी ह्याचे विलोभनीय प्रेम व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपात दिसले पण माझ्या कडील कॅमेऱ्यात त्याचे यथा योग्य साठवण होऊ शकली नाही म्हणून इंटरनेट वरील चित्र येथे प्रसिद्ध केले.

© https://shevatachyachakavarun.blogspot.com




https://m.facebook.com/story.php?story_fbid=2522752124422700&id=100000638119960

Friday, 14 June 2019

आम्ही वाघा च्या हद्दीत कि वाघ आमच्या हद्दीत ....................?

आम्ही वाघा च्या हद्दीत कि वाघ आमच्या हद्दीत ....................?


No photo description available.


No photo description available.


माझ्या लहानपणीची म्हणजे १९७५ सालची गोष्ट, आता ठाण्यात नौपाडा पोलीस स्टेशन आहे त्याच्या अलीकडे इसी टीव्ही ची शोरूम होती त्याच्या अलीकडे एक सायकल चे दुकान होते भाड्याने मिळायच्या सायकली, आणि मी ८-९ वर्षाचा, आख्या ठाण्यात टीव्ही चे एकच शोरूम आणि टीव्ही नावाची भानगडच कमी त्या वेळी मग सायकल भाड्याने घ्यायची आणि मस्त चालवायची .

नौपाडा पोलीस स्टेशन - हरिनिवास सर्कल - विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर - फॉरेस्ट रेंजर ऑफिस - तीन हात नाका च्या अलीकडे ऑक्ट्राय जुनी चौकी - मिडल स्कुल शाळा - मल्हार सिनेमा - कलकत्ता पॉवर लाऊंड्री - टेलिफोन एक्सचेंज - परत नौपाडा पोलीस स्टेशन हि हद्द
कधीतरी विष्णू नगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी पण तीन हात नाक्याची हद्द म्हणजे
फॉरेस्ट रेंजर ऑफिस च्या पलीकडे वागळे इस्टेट आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे कडे जाण्याची
बंदी होती.

एकदाच गेलो आणि जन्माची अद्दल घडली तापता चमचा हाताला नुसता हातावर टेकवण्याची भीती दाखवली गेली आणि त्या मस्तीतही तो थोडासा हातावर लागला ही............. आणि आता कुठे शरीरावरील ओळख खूण म्हणून सांगता येते कि " बर्न मार्क ऑन राईट हॅन्ड" असो

आई वडिलांनी दंडक घातला होता कि तीन हात नाक्याचे पुढे जायचे नाही कारण चंद्रनगर ला लागून फॉरेस्ट रेंजर ऑफिस होते तेच मुळे.................... बोरिवली नॅशनल पार्क - येऊर जंगल - ओवळा - नागला परिसरातील वाघ हिंस्त्र श्वापदा वर नजर ठेवायला ...................
घाटकोपर च्या पंचमहाल टेकड्या पासून घाट सुरु म्हणून ते घाटकोपर पुढे तीच टेकडी रांग, विक्रोळी हिल साईड इस्टेट, पवई, विहार, चांदिवली, बोरिवली, कांजूर,भांडुप कॉम्प्लेक्स, मुलुंड, येऊर ते थेट ओवळा - नागला पर्यंत हा झाला पूर्वेकडचा भाग त्याच्या पलीकडे पश्चिमे कडे अंधेरी कोळ डोंगरी च्या पुढे अगदी जोगेश्वरी, दिंडोशी थेट दहिसर खाडी पर्यंत वाघांचा प्रदेश .............. आणि हो हा भाग सगळा 

१९५१-५२ पर्यंत ठाणे जिल्ह्याचा भाग होता ............................
पहिले औद्यीगिकीकरण, मग निवासी इमारती आत मेट्रो कारशेड ही मग वाघ काय जंगलात राहतील काय ते येणारच - अंधेरी - पवई - विक्रोळी हिल, बोरिवली, दिंडोशी, पोखरण, उपवन वगैरे भाग सोडून वाघ ( लेपर्ड ) आज भांडुप कॉम्प्लेक्स सोना पूर भागातून बहुतेक ............थेट मुलुंड पूर्वच्या नाने पाडा गावठाण विभागात घुसला ---------------- अरे आख्या देशातून इथे किती जण स्थायिक झाले, होत आहेत आणि होणार आहेत पण त्याचे ठिकाण त्याची शिकार असुरक्षित वास्तव्य झाले तर मग तो येणारच आपल्या भागात!...............................

( प्रसंगातील बहुतेक सर्व नावे माझ्या आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत, एखाद्या प्रसंगावर समयोचित माहिती होणे आवश्यक आहे म्हणून हा खटाटोप) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
Picture Courtesy: Google map – satellite option

Displayed on 13th Jan'2018 at FB