Saturday, 13 July 2019
वारी समाधानाची - श्री भानुदास निर्मळ
मूळचा माळशिरस गावचा पण लहानपण / तरुणपण वडिलांसोबत पुण्याच्या गरिबावस्तीत राहिलेला, मुंबईत काही वर्षापूर्वी सेवा निवृत्त झाला तेव्हा त्याच्या वतीने जेष्ठ सहकारी यांनी त्याचे दोन शब्द व्यक्त केले ते खालील प्रमाणे :
"आयुष्यात आपण आपल्याला सुख समाधान मिळावे यासाठी खूप धडपड करतो पण इतरांच्या व्यापक हिताचे अन् सुखाचे लक्षात घेऊनच स्वतःच्या सुख समाधानाला आवर घालण्यासाठी प्रसंगी कटू वाटणारा निर्णय घ्या"
भानुदास निर्मळ ! एक चतुर्थ श्रेणीतील कामगार सहकारी पण त्याच्या सेवा निवृत्तीला निदान दोनशेएक माणूस जमला, एका ऑफिस बिल्डिंग च्या गच्चीवर छोटेखानी कार्यक्रम झाला. कागदी प्लेट मध्ये बटाटा चिवडा / साबुदाणा चिवडा अन बटाटा वेफर्स तसेच गोड म्हणून साजूक तुपातील दोन दोन जिलेबी व नंतर फक्कड मसाला दूध !
भानुदास एकदम बुवा माणूस !
बाहेर खात्याच्या गणवेश अन आत लाल कॉटन बंडी ! आधी भेट झाली तर मला वाटले कि डोक्याने गरम असेल कारण लाल रंग पसंत आहे म्हणून पण म्हणायचे टक्कुरं फिरले तर गरम नाहीतर पार थंड !
फक्त माऊलीचा जयघोष करायचा मग सगळी कामे होतात विनासायास !
मी खात्यात नवीन लागलो तेव्हा तर इतर सगळ्यांना चहा नाश्ता देताना माझ्या टेबलावर जवळ आले अन म्हणाले अगदी काश्याच्या लाल्या टाईप दिसता ( तरुणपणी ढप नव्हतो ) मग कडक चहा तुम्हाला माझ्या तर्फे ! मी म्हंटले असे नाही तुम्ही कशाला उगीच खर्चात पडता तर म्हणाले वयाने मोठा असलो तरी तुम्ही नवीन छोटे साहेब आहात.
मुखी माऊलीचा जयघोष ! ते ते ऑफिसात आले कि ........"अवघे गर्जे पंढरपूर......" ह्या पदाची आठवण व्हायची.
एक वर्षे मुंबईत हि गडगडाट सह उन्हाळाच्या सरते शेवटी पण पावसाळ्या आधी पाऊस धरला !
मी कार्यालयाच्या जवळ राहायचो आणि लग्न झाले नव्हते मग सकाळी कार्यालयात पोहोचलो तर चावीवाल्याने ऑफिस उघडून दिले व मी थोडी टेबल खुर्ची धड करणार तेवढ्यात मागून आव्वाज आला नेहमीचा !
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
त्या दिवशी कार्यालयांत उपस्थिती तुरळक होती, डिव्हिजन ऑफिस मधून फोन आला किती जण आले आम्ही नावे घेतली अन मग समोरून हाच जयघोष आला तर ते साहेब म्हणाले कि आलेच असतील श्री निर्मळ ! मी अचंब्याने हो म्हंटले तर समोरून फोन वरून साहेब म्हणाले तरुणपणीचा "भान्या" पार बदलून आता भानुदास बुवा झाला !
"पुण्याचे दोन जण साहेब म्हणून डिव्हीजनल ऑफिस ला आहेत, ते मला अन माझ्या बा ला पहिल्या पासून ओळखतात"
त्या दिवशी मोकळा वेळ होता मग बोलणे झाले
भानुदास चे वडील पुणे मालधक्क्यावर हमाली करायचे अन त्यांचीच आठवण म्हणून भानुदास युनिफॉर्मच्या आत लाल बंडी वापरायचे. वडिलांनी खस्ता खाल्या पण दोन मुले आणि दोन मुली ह्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, मुली शिकल्या दहावी पर्यंत पण मुले शामराव अन भानुदास शिकेना कारण त्यांना एक मित्र होता गोप्या मग तिघे मिळून हुल्लड बाजी करायचे त्यात शामराव रस्ते अपघातात स्वर्गवासी झाला वडिलांनी हाय खाल्ली भानुदास ला पुण्याचे माने साहेब व जोशी साहेब ह्यांच्या समोर उभा केला मग त्या दोघांनी भानुदास ला रोजंदारी कार्डावर भरती केला यथावकाश भान्या झाले भानुदास झाले
नोकरीत सुरवातीला भानुदासाचे मन लागेना पण बा ची इच्छा म्हणून करणाऱ्या नोकरीत रोजंदारी तर रोजंदारी पण दांडी ते मारत नव्हते, परमार्थाला अथवा वारकरी पण झाले नव्हते. खात्यात वजन टाकून दोन्ही साहेब लोकांनी भानुदासाला पर्मनंट केले, बा ने लग्न लावून दिले, कांचन लक्ष्मी म्हणून आली तेव्हा भानुदासांची मुंबईत बदली झाली. टिटवाळ्याच्या पुढे खडवलीत एक खोलीची जागा घेऊन त्यांनी आपला संसार सुरु केला, कांचन दहावी झालेली अन भानुदास आठवी नंतर पुस्तक गुल ! पण कांचन वर जीव जडला त्यांचा अन राजा राणीच्या संसारात एक छोटी परी पण आली.
पुण्यात गोप्या रिक्षा लाईन मध्ये असताना आपली मस्ती करत होता, बाई, बाटली अन गुटखा ह्याने वेढलेला अन कधी मधी वर्षा काठी भानुदासला गाठून उधारी उसनवारी !
पण गोप्याने जाताना मात्र भानुदासा कडून वचन घेतले कि माऊलीच्या दर्शनाला जाशील अन माझा पण नमस्कार सांगशील !
भान्या, भानुदास, भानुदास निर्मळ ते माउली माउली विठ्ठल विठ्ठल म्हणत येणारे अन आम्ही विष्णुदास म्हणवणारे, श्री भानुदास निर्मळ कसे झाले ते समजलेच नाही !
त्या दिवसाच्या पाऊस गोंधळ गडबडी मुळे, मला वारी बद्दल सखोल माहिती मिळाली,
भानुदास बेभान होते अन बाहेर पाऊस हि !
पावसाच्या जोर वाढला तसे भानुदास अजून बेभान होऊन जीव ओतून सांगू लागले अनेक गमती जमती वारीच्या, पुणे, सासवड, वाखरीं, उरळी कांचन, अकलूज, चांदोबाचा लिंब, सदाशिव नगर ते थेट प्रदक्षिणा, भीमा काठ आदी, भानुदास वर्ष दोन काठी कधी तुकोबांच्या तर कधी ज्ञानोबांच्या पालखी - वारीत जात जोडीदारा सोबत अन एक वर्ष तर कांचन बाई पण तुळशीवृदांवन डोई घेऊन सामील झाल्या जेव्हा मुलें मोठी झाली अन घरी आई आली होती तेव्हा !
भानूदास सांगत होते कि वारीतील आहार, जेवणखाण, उपास पदार्थ, साग भाजी, हुरडा तर कुठे जिलेबी, लाडू!
सर्व माउली पुरवते आपल्या भक्ता करवी, पैसा घेऊन जावा वारीला तर परत येतो तसाच्या तसा ! वर येते समाधान ! माउली माउली !
अश्रू थांबेना !
मी ऑफिसच्या चावीवाल्याला आवाज दिला अन त्याला आम्हा तिघांना चहा आणायला सांगितले !
चहा घेऊन आम्ही निघालो ! त्या दिवसाला बरीच वर्षे लोटली !
आज श्री भानुदास निर्मळ सेवा निवृत्तीची पार्टी देत होते अन होते समोर त्यांचे मनोगत श्री जोशी साहेबांच्या शब्दात !
"आयुष्यात आपण आपल्याला सुख समाधान मिळावे यासाठी खूप धडपड करतो पण इतरांच्या व्यापक हिताचे अन् सुखाचे लक्षात घेऊनच स्वतःच्या सुख समाधानाला आवर घालण्यासाठी प्रसंगी कटू वाटणारा निर्णय घ्या"
रहावले नाही बोललो भानुदासांशी ! म्हणाले साहेब वारीला चला !
शहरातील लोक सकाळी चालतात पण वारीच्या मार्गावर ज्ञानोबा तुकोबा ह्यांचा २५० किमी च्या वारीत चला,
पैठण - सज्जन गड वरून येणाऱ्या पालखीत चला ! अथवा ताकद दाखवू शकत असाल तर मुक्ताबाई अन गजानन महाराजच्या ४००-४५० किमी च्या पालखीत चला !
रांगोळी पताका चालतील पण फ्लेक्स बाजे नकोत
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी ! तुळशी वृंदावन घेऊन माय भगिनी येतातच
आपले स्वतःचे सुख समाधान सोडा अन वारीत चला बस माउली उभी आहे युगे अठ्ठावीस भक्तांच्या सेवेत
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
© रविंद्र गांगल
( शेवटच्या चाकावरुन -
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment