Saturday, 8 June 2019

रत्नावली

रत्नावली

आज तिची परत अचानक आठवण  यायचे कारण तसेच होते, मध्यरात्री पुण्याहून निघून भल्या पहाटे मुंबई कडे येताना मंकी हिल च्या आसपास खरंतर अलीकडे खाली नजर टाकली तर खोपोली चे सर्व लाईट दिसतात काही तांबडे बरेचसे सोनेरी अन आता एल इ डी चे शुभ्र पांढरे देखील ! सुंदर रत्ने माणके अन मोती पसरल्या सारखे दिसतात, 

गेल्या पंधरवड्या पूर्वी  तिची अन माझी फार वर्षांनी गाठ भेट झाली होती, खरंतर खरोखर आता रत्न दिसत होती....

आणि त्यातच मला पंधरा दिवसापूर्वी दिसलेल्या रत्नावली चा चेहरा दिसू लागला मग आज ठरवलेच होते कि घरी गेल्यावर रत्नावली चे बद्दल लिहायचेच  

मी दिवसाची माझी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ला संपवून प्लॅटफॉर्म वरून स्टेशन मास्टर ऑफिस कडे चाललो होतो.  उकाडा मी म्हणत होता सूर्य मावळून जवळ जवळ एखाद तास झाला होता. मी जात असताना मध्येच कोणी तरुण स्त्रीचा बंगाली ढंगात आवाज ऐकू आला हिंदीत ! 

शाब, पहचाना क्या ? 

 मै रत्ना !  

मला एक क्षण आठवले नाही तेव्हा ती एक पाऊल पुढे टाकले अन माझ्या डोक्यात प्रकाश पडला, रत्नावली ! 

वर्णन करू नये पण आता ती पिवळसर गोरी नव्हे तर चक्क दूध गोरी दिसत होती. हलकेच काळी ओढणी चेहऱ्या वरून दूर करून मला ओळख देत होती ! 

अंदाजे आता तीस बत्तीस वर्षाची शरीर थोडे भरलेले पण तरी देखील सुडौल अन मुख्य म्हणजे आता मिठ्ठास असलेला आत्मविश्वासाचा आवाज !  

मी स्तंभित झालो  ओळखली तिला  पण माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्य तिने ताडले.

साब मै रत्ना ! 

तिने परत एकदा ओळख करून दिली, 

मी म्हंटले हा हा पहचाना मैने ! लेकिन कितनी बदल गयी तू !

त्यावर ती म्हणाली हा वो तो है 

मी १९९७ च्या सुरवातीला मुंबईच्या मध्यरेल्वेच्या उपनगरी सेवेत काम करू लागलो साधारणतः सन २००० पासून कधी लॉबीत तर कधी गाडी वर काम करू लागलो अन एक दिवस हि रत्ना उर्फ रत्नावली आमच्या एका करड्या आवाजाच्या सहकाऱ्याने लॉबी जवळ असलेल्या पोलिसांच्या हेल्प डेस्क जवळ पोहोचती केली,  साधारणतः १५ ते १७ वर्षाची रत्ना तिला फार मोडके तोडके हिंदी बोलता येत होते. बाकी बंगाली !

पश्चिम बंगाल मधील स्वरूप नगर जिल्ह्यातील अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या घरची पोर अन त्यात एका पायात थोडे व्यंग म्हणजे एक पाय चालताना जास्त आतल्या बाजूला पडत असे , ती जरी सांगत नसली  तरी तिच्या घरच्यांनी बहुतेक घरकामासाठी कोणा बरोबर तिला धाडली होती मुंबईत पण त्या कुटुंबाची अन तिची मुंबईच्या गर्दीत चुकामुक झाली. 

नाही म्हणायला तिने पोटा पाण्यासाठी हार्बर लाईन वर भीक मागणे सुरु केले होते. हार्बरलाईन वर वाशीच्या पुढे उपनगरी विभाग १९९० ते २००० दशकात पनवेल पर्यंत वाढत गेला. दिवसा बेलापूर नेरुळ पर्यंत गर्दी असायची पण बेलापूर च्या पुढच्या भागात विशेष गर्दी नसायची. एक दिवस आमच्या एका सहकाऱ्याला काही टारगट मुले तिची छेड काढताना दिसली,  गरीब असली तरी कष्टकरी घरातील होती अन यौवनात येणारया मुलींच्या शरीरात होणारे बदल तिच्यात दिसत होते त्यातून गरीब अन भीक मागून दिवस काढणारी मग इतर टारगट गरीब मुले तिच्या पाठी लागू लागली.

एक दिवस गाडीची डाऊन फेरी संपवून अप साईडला येताना दोन जण   तिच्या अंगचटीला गेली होती लगेज मध्ये अन ती थोडी ओरडत होती !  

मुलेही तरुण पण गरिबाकडची मग ते सर्व राजी खुशीने अथवा गमतीत चालू होते असे आमच्या सहकाऱ्याला वाटले नाही मग त्याने आवाज दिला तसे ती मुले पळून गेली. मग त्याच  अप गाडीने ती मुंबई छत्रपती महाराज टर्मिनस मध्ये आली. बरेच दिवस स्टेशनातच मुक्काम अन भीक मागणे चालू होते,  

ती एकदा भुकेली होती म्हणून उपनगरी विभागातील कॅन्टीन मध्ये ती कोणाच्या मागे उभी राहून आली. कोणी तिथे तिला डाफरले कारण ती अस्वच्छ होती.  मग ती स्टेशनच्या सुलभ मध्ये आंघोळ करून एक दोन जुने कपडे कोणी आणून दिले होते ते बदलून स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करू लागली.

ती जरी स्वरूप नगर मधून आहे असे जरी सांगत होती तरी तसा तो बांगलादेश सरहद्दीच्या जवळचा जिल्हा असल्याने तिच्या वागण्या बोलण्यात बंगाल अन बांगला दोन्ही प्रकारच्या समाजाचाच्या संस्कृतीचा  प्रभाव होता.

जवळ जवळ काही महिने मुंबई च्या रेल्वे स्टेंशन भागात ती होती त्यात एकदा रात्रीच्या वेळी कोणी तिच्याशी उच्छाद मांडायचा प्रयत्न केला पण ती पोलीस अन इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने वाचली त्या रात्री आम्ही स्टेशन वर असलेल्या कर्मचाऱ्यांना ती विसरली नाही. नेहमी येऊन थोडी विनम्र होण्याचा प्रयत्न करायची.

एकदा एका गाडीतून एका वृद्धत्वा कडे झुकलेली प्रौढ बाई तिच्या जवळच्या एका स्त्री बरोबर कापडी व्हील चेअर मधून गाडीतून उतरताना हिने मदत केली अन त्या क्षणी तिचे नशीब बदलले असे ती आत्ता भेट झाली तेव्हा म्हणाली, त्या दोन बायका तिला मदतीसाठी घेऊन गेल्या.  त्यांनी पुढे तिला त्यांच्या घरी राहण्याचा आग्रह केला. त्या दोघीना मदत आणि घरकाम असे ती करत आहे म्हणाली. 

कधी कधी रेल्वेच्या बाजूला असलेला माणूस गाडी खाली वाऱ्याने अथवा धक्क्याने ओढला जातो अन जीवन संपते तर कधी रेल्वे खाली आलेला माणूस त्याचे जीवनच संपले असे गृहीत धरले जाते पण तो नखशिखांत सही सलामत वाचून बाहेर येतो.  

साधारणतः ह्या रत्नावलीच्या सारख्या मुली वाईट धंद्यात ओढल्या जातात पण पायातील थोड्या व्यंगा मुळे कदाचित ती कोणा दलालाच्या नजरेत पडली नसेल आणि काय सांगावे ज्या ओळखीच्या अथवा गाववाल्या बरोबर ती आली कदाचित त्याच्या हि तावडीतून वाचावी म्हणून तिची आणि त्याची चुकामुक झाली असावी.

नशीब कसे आणि कुठे घेऊन जाते काही सांगता येत नाही.

मंकी हिल वरून खोपोलीच्या नभांगणातील त्या दिव्याच्या जणू रत्ना सारख्या भासणाऱ्या मध्यरात्रीच्या अथवा पहाटेच्या  प्रकाशात रत्नावलीचा चेहरा आज  दिसला म्हणून एक अनुभव म्हणून येथे शब्दबद्ध केला.

© रविंद्र गांगल

( प्रस्तुत लेखातील नावे अन स्थळे थोडी आधारित अन काल्पनिक, अस्तित्वात असलेल्या व्यक्तीशी साधर्म्य असेल तर योगायोग समजावा.)

(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या अंदाजे निवृत्ती समयी येणाऱ्या आगामी पुस्तकाचा अथवा ब्लॉग चा भाग ज्यात अनुभव आणि सुचलेले अन्य साहित्य प्रकार आदी लिखाणाचा एक भाग)

No comments:

Post a Comment